मुंबईच्या (Mumbai) दिवा (Diva) येथे शेजाऱ्यांच्या घरी थुंकल्याच्या कारणावरून 13 वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी मुलाच्या दूरच्या नातेवाईकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 25 एप्रिल 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी दशरथ काकडे (28) हा मुलाचा नातेवाईक असून तो दिवा येथील नागवाडी येथील पीडित रुपेश विजय गोळे (13) याच्या घराजवळ राहत होता.
17 एप्रिल 2022 रोजी दुपारी काकडे हा रूपेशला कपडे घेण्यासाठी आपल्यासोबत घेऊन गेला, 17 एप्रिलनंतर रुपेश घरी परतला नाही. या प्रकरणाचा तपास करत असलेले मुंब्रा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडित रुपेश गोळे हा दशरथ काकडेसोबत कपडे घेण्यासाठी गेला होता, मात्र तो परत न आल्याने रुपेशच्या मोठ्या भावाने दशरथला फोन केला. त्यावेळी दशरथ काकडेने सांगितले आपण रुपेशला 50 रुपये दिले आणि जत्रेत सोडले.’
त्यानंतर रुपेशच्या मोठ्या भावाने मुंब्रा पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार नोंदवली. शेळके पुढे म्हणाले, ‘आम्ही या प्रकरणाचा तपास करत असताना दशरथचा या गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल आम्हाला संशय आला. आम्ही दशरथकडे विचारपूस केली की, तो रूपेशसाठी कपडे खरेदी करण्यासाठी नेमका कुठे गेला होता आणि तो कोणत्या जत्रेत त्याला सोडले होते. मात्र पुढे तपास केला असता दशरथ खोटे बोलत असल्याचे दिसून आले. (हेही वाचा: मंत्री Dhananjay Munde यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक; न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी)
त्यानंतर दशरथला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये दशरथने सत्य काय ते उघड केले. त्याने सांगितले की, तो रुपेशला मुंब्रा येथील बंद शौचालयाच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेला व तिथे त्याचा गळा आवळून खून केला. दशरथच्या घरी रुपेश गोळे थुंकल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. रागाच्या भरात आरोपीने रूपेशची हत्या केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 25 एप्रिल 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.