राज्यातील निवडणुकीदरम्यान शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या वचननाम्यात 10 रुपयांमध्ये पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकांवेळी हा मुद्दा फार गाजला. निवडणुका झाल्या, निकाल लागला. शिवसेनेकडे मुख्यमंत्री पदही आले. मात्र 10 रुपयात राज्यभर जेवणाची थाळी मिळणार हे आश्वासन पूर्ण न झाल्याने विरोधकांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका केली होती.
मात्र आज महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला 10 रुपयांमध्ये सकस आणि परवडणारे 'शिवभोजन' (ShivBhojan Thali) देण्याची महत्वाची घोषणा महाराष्ट्र विकास आघाडीने केली आहे.
महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला १० रुपयांमध्ये सकस आणि परवडणारे 'शिवभोजन' देण्याची महाराष्ट्र विकास आघाडीची महत्वाची घोषणा!
सुरवातीला प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी 'शिवभोजन' केंद्रे सुरू करणार आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची सुरुवात होणार आहे. pic.twitter.com/12Ppk8CIwl
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 23, 2019
शिवभोजन योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली होती. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी 'शिवभोजन' केंद्रे सुरू करणार आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची सुरुवात होणार आहे. याबाबत महाराष्ट्र विकास आघाडीकडून शिक्कामोर्तब झाले आहे. नव्या वर्षापासून म्हणजे पुढील महिन्यांपासून राज्यात शिव भोजन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे गोरगरिबांना दहा रुपयांत थाळी मिळेलच. पण अनेक हातांना रोजगारही मिळणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले होते. (हेही वाचा: शिवसेनेच्या 10 रु. मध्ये थाळी योजनेला सुरवात; प्रतिदिन 500 लोकांसाठी बनणार 'साहब खाना')
झुणका भाकर केंद्र योजना जशी होती, त्या धर्तीवर ही योजना असेल, असे अरविंद सावंत यांनी सांगितले. मात्र शिवसेना-भाजपची ही झुणका भाकर केंद्र योजना कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर त्यांनी बंद करून टाकली होती. याआधी तामिळनाडूमध्ये 'अम्मा कँटिन' सुरु झाले होते. मात्र त्यातील 99 टक्के केंद्रे आर्थिक परिस्थितीमुळे बंद पडली. त्यामुळे आता 'शिवभोजन'साठी पैसा उभे करणे हे सरकारचे महत्वाचे काम आहे. तसेच आता ही योजना राबवणार कशी? त्यासाठीची जागा कुठे शोधणार? त्यासाठीचा पैसा कसा उभारणार? हे प्रश्नही सरकारसमोर असणार आहेत.