
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena-UBT) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उद्यापासून कोकण दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात अनुक्रमे 23 आणि 24 या तारखेला ते रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातील काही प्रमुख ठिकाणांना भेट देतील. ते रत्नागिरी जिल्ह्यातील दोडामार्ग आणि रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतील. तसेच, पक्ष बांधणीसाठी संघटनात्मक निर्णयावर चर्चाही करतील. आदित्य यांचा हा दौरा पदवीधर मतदारसंघ निवडणुकी संदर्भात असला तरी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या यावेळच्या कोकण दौऱ्याची वैशिष्ट्य असे, की यावेळी कोणतेही प्रकारची जाहीर सभा न घेता ते खळा बैठकीला प्राधान्य देणार आहत. त्यामुळे प्रत्यक्ष तळागाळातील कार्यकर्त्यांशी बैठक घेण्यावर भर असेल. कार्यकर्त्यांच्या घर अंगणात या बैठका घेतल्या जातील.
गुरुवार, 23 नोव्हेंबर बैठकीचे वेळापत्रक
- दोडा मार्ग ते सावंतवाडी
- सावंतवाडी ते कुडाळ
- कुडाळ ते बांबार्डे
- बांबार्डे ते कणकवली
- कणकवली ते राजापूर
- राजापूर ते करबुडे
शुक्रवार, 24 नोव्हेंबर बैठकीचे वेळापत्रक
- चिपळूण ते खेड
- खेड ते महाड
- महाड ते नागोठणे
खळा बैठक कशाला म्हणतात?
कोकणामध्ये गाव खेड्यामध्ये गाव पातळीवरती काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास, हे निर्णय गावातील चौक एखाद्या नागरिकाचे घर घरासमोरील अंगण किंवा ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या बैठकांमध्ये घेतले जातात. या बैठकीचे स्वरूप अगदीच छोटेखणी असल्यामुळे या बैठकीला एखाद्या खळ्याचे रूप प्राप्त होते. त्यामुळे या बैठकीला खड्यातील बैठक किंवा खडा बैठक असे म्हटलं जाते.
आदित्य ठाकरे यांच्या खळा बैठकीचे वैशिष्ट्य असे की, या बैठका प्रामुख्याने तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या कोकणातील आमदारांच्या मतदार संघामध्ये पार पडणार आहे. या मतदारसंघांमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह दीपक केसरकर, (दोडामार्ग), उदय सामंत (रत्नागिरी), शेखर निकम (चिपळूण), योगेश कदम (खेड), भरत गोगावले (महाड) या मतदारसंघांचाही समावेश आहे.
आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत आमदार भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक हे असतील. शिवसेनेतील खोटी नंतर आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या राज्यव्यापी दौऱ्याला त्यावेळी राज्यातील जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला होता . त्यांनी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या सभांना पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केले असे त्यावेळी पाहायला मिळाले. दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे. त्यातूनच अशा प्रकारच्या दौऱ्यांचे आयोजन केले गेले आहे. त्यामुळे यावेळच्या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे