Shiv Sena: आघाडी होईल का, नाही झाली तर काय? त्या भानगडीत कशाला पडायचं आपण?, संजय राऊत यांचा शिवसैनिकांना सल्ला
Sanjay Raut | (File Image)

“अजित दादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल” असे सांगत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षाची फिरकी घेतली आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधकांकडून नेहमीच केली जाते. त्यावर राज्यातील महाविकासआघाडी सरकारला पुढील पाच वर्षे काहीच धोका नसल्याचे सत्ताधारी सांगतात. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे एका जाहीर कार्यक्रमात संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले, “आघाडी होईल का, नाही झाली तर काय? त्या भानगडीत कशाला पडायचं आपण? आपल्याला एकट्यानं लढण्याची सवय आहे. आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. कशाकरता आपण रेंगाळत बसायचं. आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे.”

संजय राऊत यांच्या भाषणामुळे पुणे आणि राज्याच्या राजकीय वर्तुळाला नवा विषय मिळाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत आपण येवढ्या जागा येतील तेवढ्या जागा येतील असे म्हणायचे नाही. आपण असे म्हणायचे की पिंपची चिंचवडचा महापौर आपला होईल. पुण्याचे पालकमंत्री आपले नाहीत. मला कोणीतरी सांगितले पालकमंत्री आपले ऐकत नाहीत. राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपलं कुणी ऐकत नाही असं म्हणतात. पण असं होता कामा नये. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज”, अशी एक टिप्पणीही राऊत यांनी केली. त्यामुळे संजय राऊत यांनी हा विनोद केला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इशारा दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (हेही वाचा, Sanjay Raut On Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांची किंमत 1.25 रुपये; संजय राऊत ठोकणार अब्रूनुकसानीचा दावा)

दरम्यान, याच भाषणात पुढे बोलताना आपल्याच विधानातील गांभीर्य लक्षात आल्यानंतर लगेच पुढे संजय राऊत म्हणाले की, “मुख्यंमत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचं आहे. साऊथ ब्लॉक, पंतप्रधान कुठे बसतात, गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे, तिथे आपल्याला टप्प्याटप्प्याने पोहोचायचं आहे. या सगळ्याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत आहे. त्यामुळे अजित पवारांना आम्ही सांगू की आमच्या लोकांचंही ऐकत जा तुम्ही, आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल”, असं राऊत यावेळी म्हणाले.