आरे जंगल नाही या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून शिवसेनेची सरकारवर टीका; संजय राऊत यांनी शेअर केलं व्यंगचित्र
Sanjay Raut (Photo Credits: Twitter)

मुंबई मेट्रो 3 चं कारशेड आरे मध्ये बनवण्यासाठी 2700 झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यानंतर ताबडतोब शुक्रवार (4 ऑक्टोबर) च्या रात्री शेकडो झाडांची कत्तल करण्यास सुरूवात झाल्याने पर्यावरण प्रेमी, प्रशासकीय अधिकारी आणि मुंबई पोलिस यांच्यामधील स्थिती तणावग्रस्त होत चालली आहे. पर्यावरणप्रेमींसोबत सध्या सत्तेत असलेल्या भाजपा पक्षाचे मित्रपक्ष शिवसेनेकडूनही या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर एक बोलकं व्यंगचित्र शेअर केलं आहे. यामध्ये न्यायलयातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे हे चित्र आहे. तसेच त्यावर 'आरे जंगल नाही' असा संदेश लिहलेला आहे.

महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूका 2019 साठी मतदान आहे. या निवडणूकीमध्ये भाजपा - शिवसेनेची युती जाहीर करण्यात आली आहे. मात्र आरे बाबतच्या निर्णयावरुन या दोन्ही पक्षांची एकमेकांविरोधी भूमिका आहे. शिवासेना नेते आणि युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील काल ट्वीटरच्या माध्यमातून मेट्रो प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. पहा काय म्हणाले आदित्य ठाकरे!

संजय राऊत यांचे ट्वीट  

'आरे कॉलनी परिसर हा वनक्षेत्रात येत असूनही त्या जागेवर मेट्रो कारशेडचे बांधकाम करण्यात येत आहे. आरे कॉलनीला संरक्षित वनक्षेत्र घोषित करण्याची विनंती सरकारी विभागांनी वारंवार केली असतानाही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने याविषयी सरकारला निर्देश द्यावेत', अशा विनंतीची पर्यावरणप्रेमींची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने काल फेटाळली आहे. मात्र आता पर्यावरण प्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.