आपल्या विधानांनी खळबळ उडवून देणारे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे बेळगाव (Belgaum) येथे दाखल झाले आहेत. बेळगाव येथे होणाऱ्या आपल्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात (Interview Program) राऊत काय बोलणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. बेळगाव आणि सीमाभाग यांवरुन कर्नाटक-महाराष्ट्र वाद फार जुना आहे. या वादातुन दोन्ही राज्यांमधील सामांवर अनेकदा संघर्ष निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे नुकतेच बेळगावला गेले होते. तेव्हा कर्नाटक पोलिसांनी त्यांना अटक करुन पुन्हा महाराष्ट्रात सोडले. त्यामुळे हा संघर्ष वाढल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या मुलाखतीबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, संजय राऊत हे बेळगाव येथे दाखल झाले आहेत. कर्नाटक पोलिसांनी राऊत यांना त्यांना विश्रांतीच्या नियोजीत हॉटेलमध्ये जायला सुरक्षेच्या कारणास्तव मज्जाव करत दुसऱ्या हॉटेलमध्ये पोहोचण्यास सांगेतले. राऊत यांनीही कर्नाटक पोलिसांची विनंती मान्य करत दुसऱ्या हॉटेलवर जाण्यास संमती दिल्याचे समजते. संजय राऊत हे बेळगाव विमानतळावर पोहोचताच विमानतळावरील केबीनमध्ये संजय राऊत यांच्यासोबत कर्नाटक पोलिसांनी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊत विमानतळावरुन बाहेर पडले. (हेही वाचा, संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर अखेर शरद पवार बोलले)
संजय राऊत हे ज्या कार्यक्रमासाठी बेळगावला जाणार होते त्या कार्यक्रमाला कर्नाटक पोलिसांनी काल सायंकाळपर्यंत परवानगी नाकारली होती. मात्र, शनिवारी (18 जानेवारी 2020) सकाळी पोलिसांनी पुन्हा या कार्यक्रमाला परवानगी दिली. दरम्यान, कर्नाटक नवनिर्माण सेनेचा प्रमुख भीमा शंकर पाटील यांनी राऊत यांच्या बेळगाव दौऱ्याला विरोध केला आहे. हे शंकर पाटील तेच आहेत ज्यांनी महाराष्ट्र आणि सीमाभागातील नेत्यांबद्दल तीव्र शब्द वापरले होते.