'सीएम उद्धव ठाकरे यांना श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करा'; शिवेसेना आमदार प्रताप सरनाईक यांची रामजन्मभुमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला विनंती
प्रताप सरनाईक व सीएम उद्धव ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला अयोध्या जन्मभुमी वाद प्रकरणी राम मंदिराच्या (Ayodhya shree Ram temple) पक्षात ऐतिहासिक निर्णय दिला दिला होता. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी एका ट्रस्टची देखील स्थापना करण्यात आली होती. आत राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी (Foundation Laying Ceremony) 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी 5 ऑगस्ट ही तारीख अंतिम करण्यात आली आहे. त्यानंतर आत देशात मुख्यत्वे महाराष्ट्रात्त या सोहळ्याच्या निमंत्रणावरून मानापमानाचे राजकारण सुरु आहे. यामध्ये आता शिवेसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांना श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करा असे पत्र, ची रामजन्मभुमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला लिहिले आहे.

भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केल्याचे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या गोविंद महाराज यांनी सांगितले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री होण्याआधी सीएम उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. मात्र अजूनही शिवसेनेला या सोहळ्यासाठी निमंत्रण आले नाही. आता आमदार प्रताप सरनाईक यांनी रामजन्मभुमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला विनंती केली आहे की, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करावे.

एएनआय ट्वीट -

आपल्या पत्रामध्ये ते लिहितात, ‘अयोध्या येथे श्री राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाची 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असला तरी मंदिर निर्माणासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या सोहळ्याचे निमंत्रण दिले जाईल, असे कळते. हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांची अयोध्या येथे श्री राम मंदिर बांधण्याविषयी आग्रहाची आणि स्पष्ट भूमिका होती. शिवसेना पक्षप्रमुख व माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनीही सातत्याने राम मंदिराबाबत आग्रही भूमिका घेतली. जेव्हा कुणी राममंदिरा बाबत शब्दही काढत न्हवते तेव्हा सातत्याने याबाबत पाठपुरावा करणारे उद्धवसाहेबच होते हे देशाने पाहिले आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे' च ठरवतील अयोध्येत जायचे की नाही- खासदार अरविंद सावंत)

राम मंदिराच्या निर्मितीसाठीचा पाया रचणारी ही शिवसेना आहे. श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी 1 कोटींची देणगी देणारा शिवसेना हा देशातील पहिला पक्ष आहे. शिवसेनेचे राम मंदिर उभारणीमधील योगदान पाहता, एका जुन्या रामभक्त शिवसैनिकाला या मंदिर ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून नियुक्त करावे अशी मागणीही मी आपल्याकडे याआधी केली होती.

या सोहळ्याला आपण माननीय उद्धवजी ठाकरे यांनाही प्रमुख अतिथी म्हणून सन्मानाने या भूमिपूजन सोहळ्याला बोलवावे व या कार्यक्रमात कोणतेही राजकारण होऊ नये अशी आमच्या सारख्या हजारो - लाखो शिवसैनिक तथा रामभक्तांची इच्छा आहे.’

दरम्यान सध्या राज्यात महा विकास आघाडीची सरकार आहे. त्यामुळे राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख निश्चित झाल्यापासून शिवसेना या सोहळ्यासाठी जाणार का याबाबत चर्चा सुरु आहे. अयोध्या रामजन्मभुमी राम मंदिराच्या भुमिपुजनाच्या आमंत्रणाची पक्ष चिंता करत नसल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रविवारी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ठरवतील अयोध्येत जायचे की नाही, असेही ते म्हणाले होते.