अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा आजपासून भारत दौरा सुरु होणार आहेत. तर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोटेरा स्टेडिअम सुद्धा सजवण्यात आले असून रस्त्यांवरील भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यानिमित्त गरिबांची घरे दिसू नयेत म्हणून भिंत सुद्धा उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व गोष्टी पाहता शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतात येण्याने गरीब, मध्यमवर्गीय जनतेला काहीही फरक पडत नसल्याचे अग्रलेखातून म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी देशभरात कमालीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ट्रम्प यांचा अहमदाबाद येथे 15 किमीचा रोड शो पार पडणार आहे. प्रथम दिल्लीत जाणार असून त्यानंतर त्यांचा राजकीय दौरा सुरु होणार आहे. पण ट्रम्प हे भारतात येतील आणि जातील सुद्धा परंतु 36 तासानंतर त्यांच्या येण्या-जाण्याच्या खुणा देशाच्या मातीत राहणार नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांच्या भेटीने देशातील सर्व प्रश्न सुटणार नसल्याची ही टीका करण्यात आली आहे.(Donald Trump India Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आजपासून भारत दौरा; अहमदाबाद येथे काटेकोर बंदोबस्तासह जय्यत तयारी)
तर गेल्याच आठवड्यात अमेरिकेने भारताला विकसनशील देशाच्या यादीतून वगळले आहे. ट्रम्प यांच्या भारत दौराच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भारताला कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. परंतु या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प काय भुमिका घेतील हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. देशात आर्थिक मंदी आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्याने हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. असो तरीही ट्रम्प यांचे स्वागत करायला हवे असे ही अग्रलेखात म्हटले आहे. पाहुणचार आणि शिष्टाचारात कुठेही आर्थिक मंदीच्या झळा बसता कामा नये असे ही शिवसेनेने म्हटले आहे.