Surya Grahan 2020: सूर्यग्रहणामुळे महाराष्ट्रातील तुळजाभवानी, विठ्ठल रखुमाईची मूर्ती सोवळ्यात
तुळजाभवानी मुर्ती सोवळ्यात (Photo Credits: Facebook)

आज 21 जून, रविवार रोजी वर्षातले तिसरे ग्रहण आहे. भारतामध्ये सकाळी 10 च्या सुमारास ग्रहणाला सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. तर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सह राज्यभर खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. सूर्यग्रहणामुळे आज देशभरातील मंदिरे बंद आहेत. तर महाराष्ट्रात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मंदिरे खुली करण्यास अद्याप मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील मंदिरे बंद आहेत. दरम्यान राज्यातील अनेक प्रमुख देवस्थानातील देवांच्या मूर्ती ग्रहणकाळात सोवळ्यात ठेवण्यात आल्या आहेत.

तुळजापूर येथील तुळजाभवानीची मूर्ती, पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाईची मूर्ती सोवळ्यात ठेवण्यात आल्या आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून मूर्ती सोवळ्यात ठेवण्याचे विधी सुरु झाले. तर ग्रहण संपेपर्यंत म्हणजे दुपारी 1.37 पर्यंत मूर्ती सोवळ्यात राहतील. ग्रहणानंतर मूर्त्यांना पंचामृत स्नान घालून धुपारती केली जाईल. (Surya Grahan June 2020 Sutak Time: 21 जूनच्या सूर्य ग्रहणाचा सुतक काळ काय? या वेळेत काय कराल काय टाळाल?)

AIR News Mumbai Tweet:

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेला शाल पांघरुन सोवळ्यात ठेवण्यात आले आहे. ग्रहण सुरु होण्यापूर्वी सोवळ्यात ठेवलेल्या मूर्त्यांना ग्रहण सुटल्यानंतर स्नान घातले जाईल. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात येईल. त्याचबरोबर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात अनुष्ठान करण्यात आलं आहे. शिर्डीतील साईमंदिरातही ग्रहणपूजा झाली. साई समाधीवर तुळशीपत्रं ठेवण्यात आलं आहे. ग्रहण सुटल्यानंतर साई मूर्ती आणि समाधीला मंगलस्नान घातले जाईल.