Shirdi Sai Mandir (Photo Credit: PTI)

आर्थिक रोकड संकटामध्ये अडकलेल्या फडणवीस सरकारने (Devendra Fadnavis Government ) शिर्डी संस्थान (Shirdi Trust ) कडून 500 कोटींचे कर्ज घेतल्याचं वृत्त नवभारत टाइम्सने जाहीर केलं आहे. महाराष्ट्र सरकारने हे कर्ज निळवंडे येथील सिंचन योजना (Nilwande Irrigation Project)  पूर्ण करण्यासाठी घेतले आहे. या सिंचन योजनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांची पाणी समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे. शिर्डी देवस्थान ट्र्स्टचे अध्यक्ष व भाजपा नेते सुरेश हावरे (Suresh Hawre) यांनी राज्य सरकारला सिंचन योजनेसाठी कर्ज मागितल्यानंतर परवानगी दिली आहे. तसेच हे कर्ज महाराष्ट्र सरकारला बिनव्याजी तत्त्वावर दिले आहे. कर्ज परत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला शिर्डी देव संस्थानने कोणताच विशिष्ट कालावधी दिलेला नाही.

निळवंडे सिंचन प्रकल्पाचं अनेक दिवसांपासून रखडलं आहे. या सिंचन प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 1200  कोटीचा आहे. शिर्डी संस्थानने महाराष्ट्र सरकारला यासाठी 500  कोटींचं कर्ज दिलं आहे, जलसंपदा विभागाने अर्थसंकल्पातून 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित रक्कमेसाठी आगामी अर्थसंकल्पात 400  कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

शिर्डीच्या साई मंदिरामध्ये देशभरातून हजारो भाविक नियमित भेट देतात. श्रद्धेपोटी अनेकजण दान करतात. नुकताच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 25 किलोचा मुकुट दान केला आहे. सध्या शिर्डीतील साई समाधीचं 100 वं वर्ष साजरा केलं जात आहे. यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे.