शिर्डी साईबाबा मंदिर ( Photo Credit: Wikimedia Commons )

2018 च्या ख़्रिस्मस आणि नववर्षाच्या सुट्ट्या विकेंडला जोडून आल्याने अनेकांनी या दिवसांमध्ये शॉर्ट ट्रीप प्लॅन केल्या होत्या. काही जण भटकायला बाहेर पडले तर अनेकांनी नववर्षाची सुरूवात देवदर्शन घेऊन केली. नाशिकच्या शिर्डी साईबाबा (Shirdi Saibaba Mandir) मंदिरातही या दिवसांमध्ये मोठी गर्दी झाली होती. 11 दिवसांमध्ये सुमारे 14.54 कोटी रूपयांचं दान भाविकांनी दानपेटीमध्ये गोळा केलं आहे.

देशातून आणि परदेशातूनही या काळात शिर्डीच्या मंदिरात दान करण्यात आलं आहे. 22 डिसेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 या काळात जमा झालेले दान सुमारे 8.05 कोटी रूपयांचं असल्याचे मंदिर प्रशासनाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी म्हटलं आहे. सहा कोटींचं दान हे ऑनलाईन पेमेंटआणि विविध कार्ड्स, चेक आणि डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून झालं.

पैशांच्या स्वरूपात जसे दान झाले तसेच सुमारे 19 लाखाच्या सोन्या,चांदीच्या स्वरूपातही भाविकांनी दान केले आहे. अमेरिका, लंडन,चीन, जपान अशा 19 विविध देशातून अंदाजे 30.63 लाख रूपयांचे दान करण्यात आले आहे. 11 दिवसांच्या सुट्ट्यांच्या काळात भाविकांच्या दानासोबत पेड पास सेवेतून, ऑनलाईन दर्शन सेवेमधून प्रशासनाने 3.62 कोटी कमावले आहेत. या काळात देशातील विविध भागातून सुमारे 9.5 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे.