नवीन वर्षाची सुरुवात मंगलमयी व्हावी यासाठी अनेक साईभक्त आपल्या साईंच्या दर्शनासाठी शिर्डीस जातात. अशावेळी अनेक मैल अंतर पार करुन आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून 31 डिसेंबर ला रात्रभर हे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून 31 डिसेंबरची शेजारती व 1 जानेवारीची पहाटेची काकड आरती होणार नाही. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यासर्व भाविकांना साईंच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा, व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे, या उद्देशाने 31 डिसेंबरला साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले आहे.
हेदेखील वाचा- 2020 Holiday Calendar: जाणून घ्या कधी आहेत सुट्ट्या आणि कसे करू शकता तुम्ही नवीन वर्षातील फिरण्याचे प्लॅन्स
याशिवाय नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे 25 डिसेंबर, 31 डिसेंबर व1 जानेवारी, असे तीन दिवस श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहणार आहे. तसेच 31 डिसेंबर व 1 जानेवारी असे दोन दिवस वाहन पूजा बंद राहतील, याची साईभक्तांनी नोंद घ्यावी. मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सर्व साईभक्तांची नववर्षाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी शिर्डी साई संस्थानाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही प्रकारची गडबड न करता शिस्तबद्ध पद्धतीने साईंचे दर्शन घ्यावे अशी विनंती संस्थानाकडून करण्यात आली आहे.