दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि आनंदवनच्या सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे (Sheetal Amte-Karajgi) यांनी सोमवारी आत्महत्या केली. शीतल यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राहत्या घरी आत्महत्या केली. सध्यातरी आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. मात्र कौटुंबिक वादातून शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. डॉ. शीतल आमटे या विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या.
वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी शीतल आमटे यांना मृत घोषित केले. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून आपला जीव दिला आहे.
डॉ. शीतल आमटे-करजगी या एक चिकित्सक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, अपंगत्व विशेषज्ञ आणि छायाचित्रकार आहेत. शीतल आमटे या नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या. त्यानंतर त्या आपल्या आजोबांच्या ध्येयानुसार आनंदवन येथे काम करण्यासाठी कुटुंबात सामील झाल्या. त्यांचा भाऊ कौस्तुभ आनंदवनसाठी अकाउंटंट आहे आणि त्यांचे डॉक्टर काका प्रकाश आमटे आणि काकू मंदाकिनी आमटे हे देखील समाजसेवक आहेत. (हेही वाचा: Dr. Sheetal Amte Suicide: आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या, कारण अस्पष्ट)
शीतल आमटे यांना जानेवारी 2016 मध्ये, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्यांची 'यंग ग्लोबल लीडर 2016' म्हणून निवड केली होती. दक्षिण आशियातील एक सर्जनशील परोपकारी मॉडेल उभे करण्याचे उद्दीष्ट असलेल्या दक्षिण आशियाई ब्रिज उपक्रमाची त्या एक सक्रिय सदस्या होत्या. एप्रिल 2016 मध्ये, त्यांना संयुक्त राष्ट्राद्वारे 'इनोव्हेशन अॅम्बेसेडर' म्हणून निवडले गेले होते आणि त्या 'इनोव्हेशन्स ऑफ पीस' च्या सल्लागार होत्या, जे इनोव्हेशनवरील जागतिक समिट आणि संयुक्त राष्ट्र संघाचा पुढाकार आहे. 2016 मध्ये त्यांना इंक फेलोशिपही मिळाली होती. शीतल या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बोर्डाच्या सदस्य होत्या.