राज्यातील कोविड-19 (Covid-19) संसर्गाची स्थिती भयावह आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटासोबतच इतर अनेक आव्हानं सरकारसमोर आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनीच्या समस्यांकडे लक्ष वेधले असून त्यांना दिलासा देण्यासाठी 3 प्रमुख मागण्या देखील केल्या आहेत. तसंच मुख्यमंत्री या मागण्यांचा विचार करतील आणि जनतेसाठी दिलासादायक निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.
कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुन्हा संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला आहे. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असल्याने हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांकडे त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
शरद पवार यांनी केलेल्या मागण्या:
1. एफल-3 परवानाधारक हॉटेल-परमीटबार मालकांना अबकारी कर भरण्यापासून किमान 4 आठवड्यांची सूट द्यावी.
2. वीज बिल आणि मालमत्ता कर यात सूट मिळावी.
3. केंद्र सरकारने आपत्कालीन पतरेखा हमी योजना अंमलात आणून त्यास 30 जून 2021 पर्यंत मूदतवाढ दिली आहे. तसंच पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांसाठी योजना जाहीर केली आहे. केंद्राप्रमाणे राज्याने देखील उद्योग-व्यवसायाला चालना देणाऱ्या योजना राबवाव्यात.
ANI Tweet:
कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. pic.twitter.com/wc1l8Fs6FG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 7, 2021
आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मा. मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, हा विश्वास मला आहे.@CMOMaharashtra #COVID19 #Maharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 7, 2021
दरम्यान, शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर विश्रांतीचा कालावधी संपताच पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. याची माहिती पवार यांची लेक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत दिली.