Deepak Kesarkar On Shiv Sena: शिवसेना फुटीमागे प्रत्येक वेळी शरद पवार; दिपक केसरकर यांचा खळबळजनक आरोप
Deepak Kesarkar (Photo Credit- ANI)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोठा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आजवर जेवढ्या वेळा शिवसेना (Shiv Sena) मोठ्या प्रमाणावर फुटली त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार हेच असल्याचा धक्कादायक आरोप केसरकर यांनी केला आहे. छगन भुजबळ यांना शिवसेनेतून पवार यांनीच फोडले. नारायण राणे यांनाही शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवार यांनीच मदत केल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. राज ठाकरे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हाही शरद पवार यांचाच हात त्यापाठी होता असेही केसरकर यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना ही आजही एनडीएमध्येच असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता नेमकी शिवसेना कोणाची हा सवाल पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. दरम्यान, या आरोप प्रत्यारोपत महाविकासआघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आताचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल शिंदे गटाकडून होतो आहे.

दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की, मी राष्ट्रवाद काँग्रेस मध्ये होतो. तेव्हा त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पवार यांचे वैशिष्ट्य असे की शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा तेव्हा शरद पवार हेच त्यामागे होते. बाळासाहेब हयात असताना त्यांनी त्यांना इतक्या यातना का दिल्या? या प्रश्नाचे उत्तरही शरद पवार यांनी महाराष्ट्राला दिले पाहिजे असे केसरकर म्हणाले. केसकर यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादीत असताना आपण अनेक गोष्टींचे साक्षीदार आहोत. शरद पवार यांनी नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेण्यासे स्वातंत्र्य होते. शरद पवार यांनी त्याबाबत बंधन घातले नाही. हा पवार यांच्या मनाचा मोटेपणा होता असेही केसरकर यांनी सांगितले.

नारायण राणे यांच्यापूर्वी शरद पवार छगन भुजबळ यांना स्वत:च घेऊन गेले होते. राज ठाकरे यांच्याही पाठीशी शरद पवार यांचेच आशीर्वाद होते. आजवर मातोश्री कधीही सिल्व्हर ओकच्या दारी गेली नाही. आम्ही तसे ऐकले नाही. आपला पक्ष वाढावा. तो सत्तेत राहावा असे शरद पवार यांना वाटणे स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना मात्र हे कधीही मान्य नव्हते. शिवसैनिक हा कट्टर असतो तो कधीही शरद पवार यांच्या दावणीला बांधला जाणार नाही, असे केसरकर म्हणाले.