राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच शरद पवार यांच्यावर बुधवारी करण्यात येणारी शस्त्रक्रिया नीट पार पाडावी यासाठी सदिच्छा दिल्या जात आहेत. याचपार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), भारतीय पार्श्वगायक लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाले आहे. हे देखील वाचा-Pandharpur-Mangalvedha Constituency By-Election: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी जाहीर; जयंत पाटील यांची माहिती
उद्धव ठाकरे यांचे मानले आभार-
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! @OfficeofUT@CMOMaharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
लता मंगेशकर यांचे मानले आभार-
माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे.@mangeshkarlata
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
राज ठाकरे यांचे मानले आभार-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार! @RajThackeray
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवरून शरद पवार हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. महत्वाचे म्हणजे, शरद पवार हे येत्या काही काळात पश्चिम बंगाल आमि केरळमध्ये प्रचार दौरे करणार होते. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. ज्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.