Sharad Pawar | (Photo Credits-Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना रविवारी (28 मार्च) सायंकाळी अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर तातडीने त्यांना मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाले. ज्यामुळे उद्या (31 मार्च) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु, आज (30 मार्च) पुन्हा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

"शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. उद्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु, पवार यांना अचानक आज त्रास होत असल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे", अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हे देखील वाचा- Sachin Sawant Tested Covid19 Positive: काँग्रेस नेते सचिन सावंत यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

नवाब मलिक यांचे ट्वीट-

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवरून शरद पवार हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. महत्वाचे म्हणजे, शरद पवार हे येत्या काही काळात पश्चिम बंगाल आमि केरळमध्ये प्रचार दौरे करणार होते. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. ज्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.