शरद पवार (Photo credit : Youtube)

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद 2019च्या निवडणुकीवर होतील यात काही शंका नाही. या झालेल्या सेमीफायनलमध्ये भाजपा पूर्णतः अपयशी ठरली असून, कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांना मात देण्यासाठी नव्याने मोर्चेबांधणी करण्याची त्यांना गरज आहे. यावर आत्मनिरीक्षण करून भाजप नेते अपयशाचा सखोल विचार करतीलच, त्याधी राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी भाजपाकडून घडलेल्या चुकांचा पाढा वाचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 78 वा वाढदिवस, यानिमित्त जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, 'या निवडणुकीत भाजपासाठीचा पर्याय म्हणून कॉंग्रेसने फार महत्वाची भूमिका बजावली. साधारण साडेचार वर्षांचा केंद्राचा कारभार, त्यांनी घेतलेले निर्णय, आक्रमक प्रचार याबाबत जनतेने स्पष्ट नाराजी व्यक्त केली. स्वायत्त संस्थांवर मोदी सरकारने केलेला हल्ला लोकांना पसंत पडला नाही. ज्यावेळी मोदी सत्तेवर आले त्यावळी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. नोटबंदीसारखा चुकीचा निर्णय घेतला, ज्याचा फटका मध्यम आणि लहान व्यावसायिकांना बसला, यामुळेच जनतेमध्ये रोष पसरला.'

मोदींच्या प्रचाराबद्दल पवार म्हणाले, ' या निवडणुकीच्या प्रचाराचे सूत्र हे व्यक्तिगत हल्ल्यावर होते. त्यांचा निशाणा हा फक्त गांधी घराण्यावर होता. आजच्या तरुण मतदारांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा अगदी राजीव गांधींनाही पाहिलेले नाही. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पाहिले आहे. हे दोघेही सत्तेच्या खुर्चीवर नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करणे जनतेला रुचले नाही. त्याचसोबत प्रचारादरम्यान मोदींनी वापरलेली धमकीयुक्तभाषाही लोकांना आवडली नाही. मोदींनी सत्तेचा फायदा घेतला आणि त्याची नोंद जनतेने घेतली. मोदींबद्दल असलेली नाराजी लोकांनी आपल्या मतामधून दाखवली.'

पाच राज्यांमधील निवडणूक निकाल पाहता काँग्रेसचे नेतृत्व जनतेने स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनेही विरोधी आघाडीत सहभागी व्हावे, काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.