कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता मागील 8-9 महिन्यांपासू राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होतानाचे चित्र राज्यात पाहायला मिळत होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा (School Reopen) टप्प्याटप्प्याने सुरु होतील असा सरकारचा विचार सुरु होता. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune And Pimpri Chinchwad) मधील शाळा सध्या तरी सुरु होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यातील नववी-बारावीचे वर्ग सुरु करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुणे शहरातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शाळा नोव्हेंबर अखेरपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शाळा येत्या सोमवारपासून सुरु करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.हेदेखील वाचा- महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? राज्यातील शिक्षणसंस्थेबाबात झालेल्या गोंधळावरून आशिष शेलारांचा सरकाराला सवाल
कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकार संभ्रमावस्थेत आहे. यामुळे टप्याटप्प्याने 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याच्या विचारात असलेल्या प्रशासनाने एक पाऊल मागे घेत तूर्तास तरी शाळा सुरु होणार नसल्याचे सांगितले आहे.
राज्यात काल दिवसभरात 5760 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 17 लाख 74 हजार 455 वर पोहोचली असून मृतांची संख्या 46,576 वर पोहोचली आहे. सद्य घडीला राज्यात 79,873 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण 16,47,004 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. काल (21 नोव्हेंबर) दिवसभरात राज्यात 4,088 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.