सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा स्थगित | (Photo credit: archived, edited, representative image)

Khatav Pusesawali Violence: सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काही काळ स्थगित (Internet Service Suspended in Satara ) करण्यात आल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील खाटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरात अज्ञातांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या कारणावरुन दोन गटात जोरदार वादावादी झाली. त्यातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. परिणामी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा विचारात घेऊन गंभीर पावले उचलल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केल्याचे वृत्त आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर अज्ञातांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने  दोन गटात रात्री 9.30 च्या दरम्यान वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की जमाव प्रक्षुब्ध झाला. त्यातून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी जाळपोळही झाली. लोक आमनेसामने आले. त्यातून पुन्हा काही हिंसक घटना घडल्या. ज्यात चार लोक जखमी झाले. एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले टाकली. प्राथमिक उपाय म्हणून पोलिसांनी पहिल्यांदा इंटरनेट सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले असून, कारवाई सुरु आहे.