Sanjay Raut | (PC - ANI)

Khichdi Scam: उद्धव गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचा (Khichdi Scam Case) तपास आता संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचला आहे. मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स युनिटला (EOW) तपासात मोठे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिचडी घोटाळा प्रकरण अंदाजे 6.37 कोटी रुपयांचे आहे. या खिचडी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूच्या म्हणण्यानुसार, खिचडी पॅकेटमध्ये असायला हवे त्यापेक्षा कमी वजनाची खिचडी पुरवली जात होती.

संजय राऊत यांच्या कुटुंबीयांच्या खात्यावर पैसे -

या घोटाळ्यात सह्याद्री रिफ्रेशमेंटने बीएमसीची फसवणूक करून 6.37 कोटी रुपये कमावले. त्यापैकी सुमारे 1 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांवर पाठवण्यात आले. EOW नुसार, 14.75 लाख रुपये संजय राऊत यांची मुलगी विधीता संजय राऊतच्या खात्यात गेले. त्याचवेळी संजय राऊत यांचा भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यावर 7.45 लाख रुपये पाठवण्यात आले. याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या खात्यावर 45 लाख रुपये पाठवण्यात आले आहेत. (हेही वाचा - Sanjay Raut On ED Notice: ईडीचा माणूस भाजप कार्यालयात अडकला असेल; संजय राऊत यांची खोचक प्रतिक्रिया, दुपारी पत्रकार परिषद घेत देणार सविस्तर प्रतिक्रिया)

EOW ने नोंदवला संजय राऊत यांच्या भावाचा जबाब -

खिचडी घोटाळा प्रकरणात EOW ने खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांचा जबाब नोंदवला आहे. संदीप राऊत यांनी ईओडब्ल्यूला सांगितले की सह्याद्री रिफ्रेशमेंटच्या खात्यातून त्यांच्या खात्यात पैसे आले आहेत आणि त्यांना हे पैसे भाड्याने मिळाले आहेत. ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी बँकेतील व्यवहारांची तपासणी केली असता, त्यांना संदीप राऊत यांच्या खात्यात 8 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे आढळले. या आर्थिक व्यवहाराबाबत अधिका-यांनी संदीप राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांची 300 चौरस फूट जागा खिचडी बनवण्यासाठी वापरली आहे. ही रक्कम त्या जागेचे भाडे म्हणून घेतल्याचा दावा संदीप राऊत यांनी केला. ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्याने सांगितले की, संदीप राऊत यांनी यासंदर्भात कोणतेही पत्र किंवा संबंधित कागदपत्रे दिलेली नाहीत.

विधीता राऊतच्या खात्यात पैसे -

EOW अधिकाऱ्याने सांगितले की, संजय राऊत यांची मुलगी विधीता राऊत हिच्या खात्यावर 14.75 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. हे पैसे कुठून आले? असा सवाल EOW अधिकाऱ्यांनी केला आहे. खिचडी घोटाळ्याप्रकरणी सजय राऊत यांचा धाकटा भाऊ संदीप राऊत याची ईओडब्ल्यूने 6 ऑक्टोबर रोजी चौकशी केली होती. दरम्यान, संदीप राऊत यांनी म्हटलं आहे की, त्यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. संजय राऊत यांचा भाऊ असल्याने त्यांचा छळ केला जात आहे. बीएमसीने खिचडी बनवण्यासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट्सला 6.37 कोटी रुपये दिले होते. (हेही वाचा - Sanjay Raut on Devendra Fadnavis: 'देवेंद्र फडणवीस हतबल, गुडघे टेकले', संजय राऊत यांची घणाघाती टीका)

काय आहे प्रकरण?

कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रात परप्रांतीय मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. यात 8.64 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका फर्मविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. या घोटाळ्यात अनेकांची चौकशीही झाली आहे. ऑगस्टमध्ये युवासेना अधिकारी सूरज चव्हाण यांची तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली होती. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचा जवळचे असल्याचे बोलले जाते.