पुरग्रस्तांना पुरवल्या जाणाऱ्या सामानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोची जाहीरातबाजी, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Ration Packets (Photo Credits-Twitter)

सांगली (Sangali) आणि कोल्हापूरसह (Kolhapur) राज्याच्या विविध ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सांगली येथील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. तर पुरात अडकलेल्या नागरिकांना मदतीसाठी फडणवीस यांच्याकडून अन्नधान्य पुरवण्यात आले. मात्र पुरवण्यात आलेल्या अन्नधान्यांच्या पाकिटावर फडणवीस यांच्या फोटोची जाहीरातबाजी करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे आता नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पुरग्रस्तांना पुरवण्यात आलेल्या अन्नधान्याच्या पाकिटात फडणवीस यांच्याकडून गहू आणि तांदूळ मोफत वाटप करण्यात आले. मात्र मदतीचा हात म्हणून पुढे केलेल्या पाकिटांवर तर फडणवीस यांची जाहीरताबाजी दिसून आली. या प्रकारावर नेटकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीसुद्धा टीका केली आहे. सरकारच्या पैशांवर अशा पद्धतीची जाहीरातबाजी करणे चूकीचे आहे. तर नागरिक सरकारला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही असे सुद्धा शेट्टी यांनी मत मांडले आहे.

त्याचसोबत धननंय मुंडे यांनी सुद्धा या प्रकारावर ट्वीट करत असे म्हटले आहे की,सरकारची प्राथमिकता कशाला? स्टिकर छापायला. स्टिकर छापण्यासाठी पुरग्रस्तांना 2 दिवस मदत सुद्धा करण्यात आली नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

मात्र जाहीरात बाजीवरुन आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच पाकिटांवर लावण्यात आलेले हे फोटो रेशनच्या दुकानदाराने लावल्याचे स्पष्टीकरण हाळवणकर यांनी दिले आहे. पाकिटांवर महाराष्ट्र शासन लिहिण्यास सांगितले होते. परंतु त्यांनीच हे फोटो लावल्याचे बोलले जात आहे.