अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवानिवृत्ती किंवा मृत्युनंतरच्या लाभासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर
CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

राज्यातील अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers) मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता, 100 कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.

अशा एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत मान्यता दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.

दुसरीकडे, पोषण ट्रॅकरचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याने राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात लवकरच जमा केला जाईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. यासाठी सुमारे 51 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: उस्मानाबादमधील प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजनात आढळला सरडा, 40 विद्यार्थ्यांना विषबाधा)

553 तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना या निर्णयामुळे अनुक्रमे प्रत्येकी 500 रु आणि 250 रु दरमहा प्रोत्साहन भत्ता मागील थकबाकीसह उपलब्ध होणार आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या 7 महिन्यांच्या कालावधीसाठी सदर प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या थेट बँक खात्यावर देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पोषण ट्रॅकर अॅपमधून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या, कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना हा प्रोत्साहन भत्ता मिळेल.