World Youth Skills Day 2020: ‘जागतिक युवा कौशल्य दिना’निमित्त आज रोटरी क्लब ऑफ बॉम्बेतर्फे प्रशिक्षणार्थींना मोबाईल टॅबलेट वितरणाचा ई-शुभारंभ
World Youth Skills Day (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रामध्ये आज जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) साजरा करण्यात आला. यावेळी विविध ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे आज या दिवसाचे औचित्य साधून, सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना मोबाईल टॅबलेट वितरणाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या वतीने ऑनलाईन वेबिनार तसेच कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत फेसबूक आणि युट्यूब लाईव्हद्वारे राज्यभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षणे ऑनलाईन साधनांच्या आधारे देण्याचा मानस यावेळी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

सलाम बॉम्बे फाऊंडेशनमार्फत गरीब विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांसाठी ब्युटी आणि वेलनेस, विविध घरगुती उपयोगाच्या वस्तुंची दुरुस्ती, मोबाईल रिपेरिंग, बेकरी उत्पादने, ज्वेलरी डिझाईन, माध्यमे, करमणूक आणि क्रीडाविषयक अशी विविध कौशल्य प्रशिक्षणे दिली जातात. सध्या विद्यार्थ्यांना ही प्रशिक्षणे ऑनलाईन दिली जातात. या प्रशिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नाही अशा विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बेमार्फत विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थींना या मोबाईल टॅबलेट वितरणाचा ई-शुभारंभ आज झाला.

यासोबतच सांगली येथील स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्यामार्फत राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला. दुपारी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत झालेल्या फेसबूक आणि युट्यूब लाईव्हमध्ये प्रशिक्षणार्थी व संस्थांचा ऑनलाईन गौरव करण्यात आला. (हेही वाचा: कौशल्य वाढविणे वेळेनुसार त्यात बदल करणे काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात एकही तरुण कौशल्य प्रशिक्षणाशिवाय किंवा रोजगाराशिवाय राहणार नाही यासाठी कौशल्य विकास विभाग व्यापक कार्य करेल, असे श्री मलिक म्हणाले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता यासंदर्भातील कौशल्य प्रशिक्षणावर यापुढील काळात अधिक भर देण्यात येईल, असेही मंत्री श्री.मलिक यांनी यावेळी सांगितले.