Shiv Sena MP Sanjay Raut | (File Photo)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये काल एका नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला (Retired Navy Officer) शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घडल्या प्रकारावर महाराष्ट्र सरकारवर टीका व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर पोलिसांनी तडक कारवाई करत या आरोपींना ताब्यातही घेतले. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य, कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय करणार नाही, असे ट्वीट केले आहे. घडल्या प्रकाराबाबत विरोधी पक्षाने महाराष्ट्र सरकार व शिवसेनेवर ताशेरे ओढले होते, या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे ट्वीट केले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, ‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्याच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.’

पहा ट्वीट -

पुढे ते म्हणतात, विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे हे दुर्दैव आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने, एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता व तणाव निर्माण होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे.’ (हेही वाचा: सीएम उद्धव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण; शिवसेनेच्या कमलेश कदमसह चौघांना अटक)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे व्यंगचित्र  (Cartoon) व्हॉट्सअॅपवर पाठवल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या 8-10 कार्यकर्त्यांनी, काल नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर शिवसेनेचे कमलेश कदम यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली. या घटने नंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय दुःखद असल्याचे ट्वीट केले होते. तसेच आमदार अतुल भातखळकर यांनी, मुख्यमंत्री घरी बसून हुकूमशाही चालवत आहेत असा टोला लगावला होता.