Mumbai: मुंबईत सील करण्यात येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांची आरटी-पीसीआर चाचणी होणार
Mumbai (Photo Credits-ANI)

मुंबईतील (Mumbai) कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या अटोक्यात आली आहे. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता मुंबई महानगरपालिकेने पूर्वतयारीच्या कामांना गती दिली आहे. यातच कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात राहावी, यासाठी मुंबईतील रहिवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, या चाचणीला कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. परंतु, अधिकाधिक रहिवाशांनी आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबई गेल्या 24 तासात 365 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईत सध्या 4 हजार 666 रुग्ण सक्रीय आहेत. मुंबईत आतापर्यंत 43 इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीतील रुग्णांवर उपचार सुरु आहेत. परंतु, या रुग्णांमुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी इमारतीतील नागरिकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्याचे ठरवले आहे. याबाबत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. हे देखील वाचा- Co-WIN Launches New API: आता घरबसल्या समजणार तुम्ही लस घेतली की नाही, कोव्हिनने सुरू केले KYC-VS अॅप्लिकेशन, जाणून घ्या कसं करतं काम

कोरोनाची स्थिती पाहता साधारणत: सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका जाणवणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी सतर्कतेने पावले उचलली जात आहेत. याकरिता मास्क, सुरक्षित अंतर या करोनासुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांना विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत आहे.