Resident doctors in Mumbai | Photo Credits Twitter/ ANI

मुंबईमध्ये दिवसागणिक कोरोना रूग्णांमध्ये आता वाढ होत असल्याने आता आरोग्य यंत्रणेवर दबाव वाढत असल्याचं चित्र आहे. दरम्यान मुंबई मध्ये रहिवासी डॉक्टर देखील आता प्रशासकीय यंत्रणेच्या नव्या नियमावलीचा निषेध करत आहेत. कोविड 19 च्या रूग्णांवर उपचार केल्यानंतर केवळ एका दिवसाची सुट्टी देण्याच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला आहे. हातावर काळ्या पट्ट्या (Black Ribbons) बांधून ते काम करत आहेत. रहिवासी डॉक्टरांची (Resident Doctors) मागणी आहे की पूर्वीप्रमाणे कोविड वॉर्डमध्ये काम केल्यानंतर 7 दिवसांची रजा मिळावी. मात्र सध्या केवळ 1 दिवसाची रजा मंजूर करण्यात आली आहे.

मुंबई मध्ये मागील काही दिवसांपासून 2 हजारांपेक्षा अधिक रूग्ण कोरोनाबाधित होत असल्याचं समोर येत आहे. दरम्यान आता 50पेक्षा अधिक वयाच्या रूग्णांना देखील होम आयसोलेशन ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणं बंधनकारक केले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भार आहे.

दरम्यान मुंबईमध्ये काल खाजगी डॉक्टरांना देखील त्यांचे क्लिनिक्स उघडण्याचे सरकारने दिले पण विमा कवच न दिल्याने काही डॉक्टरांनी आपले गार्‍हाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे.

मुंबईमध्ये मुंबई महानगर पालिका हॉस्पिटल्ससोबतच खाजगी हॉस्पिटल्समध्येही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतू मागील 6 महिन्यांपासून अविरत काम करत असल्याने त्यांच्यावर ताण आहे. अनेक ज्येष्ठ आणि तरूण डॉक्टर्स व अन्य आरोग्य कर्मचार्‍यांनी आपला जीव कोविड 19 च्या रूग्णांना मदत करता करता गमावला आहे.