CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजाराने गेल्या दीड वर्षांपासून लोकांचे आर्थिक आयुष्य ठप्प झाले आहे. या व्हायरसचा आरोग्याबरोबरच लोकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. विशेषत: असे लोक जे चित्रपट-अभिनय व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांची अवस्था खूपच वाईट झाली आहे. गेल्या वर्षापासून शुटींगवर कोरोनाचा वाईट परिणाम झाल्याने परिणामी चित्रपट व्यवसायही अनेक संकटांचा सामना करीत आहे. यामुळे अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे लोकांकडून मदतीचे आवाहन केले होते. हे पाहता गुरुवारी महाराष्ट्र सरकारने लोक कलाकारांसाठी (Folk Artists) मदतीची घोषणा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासह कोविड-19 बाधित कलाकारांसाठी मदत पॅकेज जाहीर केले. यामध्ये लोककलाकार, लोककला मंडळ चालक, मंडळ मालक आणि उत्पादक यांचा समावेश असेल. मुख्यमंत्री सचिवालयाकडून दिलेल्या निवेदनानुसार ठाकरे यांनी राज्यातील 56,000 कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. (हेही वाचा: 14 ऑक्टोबर 2021 रोजी म्हाडातर्फे निघणार कोकण मंडळाच्या 8,205 सदनिकांसाठी सोडत; जाणून घ्या कुठे असतील ही घरे)

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी अमित देशमुख यांची भेट घेतल्यानंतर कलाकारांसाठी कोविड सहाय्य पॅकेज मंजूर केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देशमुख यांना राज्य मंत्रिमंडळासंदर्भात तातडीने ठराव मांडण्याचे निर्देश दिले. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर कलाकारांसाठी एकरकमी कोविड दिलासा अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.

राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास 8 हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास 48 हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार 5 हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास 28 कोटी रुपये खर्च होणार आहे.

राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी 6 कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.