कोरोनाचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. मात्र राज्यातील जनतेचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून हळूहळू लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्यात येत आहे. सध्या राज्यात अनलॉक 1 चा टप्पा सुरू असून टप्प्याटप्प्याने दुकाने तसेच अन्य सेवा सुरु करण्यात येत आहे. यात आजपासून रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस सेवा (ST Bus) आज टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी असून यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणा-या लोकांना याचा फायदा होईल.
लोकसत्ता ने दिलेल्या बातमीनुसार, पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील एसटी बसेस सुरू करण्यात येणार आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घालून देण्यात आलेले नियम पाळून ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र हादरले! राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
या जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक करताना 22 पेक्षा जास्त प्रवासी एसटी बसमध्ये घेतले जाणार नाहीत. Social Distancing राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी -जयगड, रत्नागिरी-निवळी, रत्नागिरी-हातखंबा गाव, रत्नागिरी-खंडाळा, रत्नागिरी-पावस, रत्नागिरी-पाली, रत्नागिरी-गणपतीपुळे, रत्नागिरी-नाटे, रत्नागिरी-चिपळूण इत्यादी फेऱ्या आजपासून सुरु होतील. यासोबत जनतेने सहकार्य करून राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे सांगण्यात येत आहे. रत्नागिरीत 381 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 15 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच 207 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 पोहचला आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 590 जणांनी आपला जीव गमवला आहे. मात्र, राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यात मुंबईतील रुग्णांचा अधिक समावेश आहे.