बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने आरोपीने थेट पीडितेच्या मुलीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये संबंधित महिलेची 10 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अहमदनगरच्या (Ahmednagar) पारनेर (Parner) तालुक्यातील वाघुंडे गावाच्या शिवारात गुरुवारी घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात भितीजनक वातावरण पसरले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री उशिरा सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीवर पारनेरमधील आदिवासी समाजातील 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, आरोपीनी पीडितेला हा गुन्हा मागे घेण्यास सांगितला. संबंधित महिला व तिची दहा वर्षाची मुलगी 13 ऑगस्टला आपल्या झोपडीमध्ये जेवण करत होत्या. यावेळी तेथे आरोपी राजाराम तरटे व अमोल तरटे हे दोघे दुचाकीवर आले. त्यानंतर त्यांनी सदर महिलेला बलात्काराचा गुन्हा मागे घे, असे म्हणून शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संबंधित महिलेची दहा वर्षाची मुलगी झोपडीच्या बाहेर आली. त्यावेळी आरोपीने त्याच्या हातातील पेट्रोल हे महिलेच्या अंगावर फेकले असता, तिच्या मुलीच्या अंगावर पडले. त्यानंतर आरोपीने काडी पेटवून ती मुलीच्या दिशेने फेकली असता मुलीच्या अंगावरील फ्रॉक पेटला. या घटनेमध्ये संबंधित महिलेची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे. हे देखील वाचा-पिंपरी-चिंचवड: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीची गळा आवळून हत्या
या घटनेनंतर आरोपींवर कडक कारवाईची मागणी होत आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास अहमदनगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करीत आहेत.