Ramdas Athawale: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाची विधानसभा निवडणुकीसाठी आठ ते दहा जागांची मागणी; महायुतीच्या चिंता वाढल्या
Ramdas Athawale | (Image Credit - Twitter)

महायुतीमधील घटकपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने महायुतीत त्यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे आरपीआयचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती देखील रामदास आठवले यांनी दिली आहे. रामदास आठवले म्हटले आहेत की " आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आठ ते दहा जागा हव्या आहेत. मला मान्य आहे की महायुतीत भाजपाबरोबर अनेक मित्र पक्ष आहेत. परंतु, आमची आठ ते दहा जागांची मागणी आहे.” (हेही वाचा - Shiv Sena Foundation Day 2024: मुंबईमध्ये उद्या जल्लोषात साजरा होणार शिवसेना स्थापना दिन; ठाकरे व शिंदे गटाकडून खास कार्यक्रमांचे आयोजन)

रामदास आठवले म्हणाले, “महायुतीत एकनाथ शिंदेंचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष, आरपीआय, महादेव जानकरांचा पक्ष, सदाभाऊ खोत आणि विनय कोरे यांचे पक्ष देखील आहेत. त्यात आरपीआयला आठ ते दहा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. यामध्ये कमी-जास्त होऊ शकतं. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही आठ ते दहा जागांची मागणी केली आहे.”

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मराठा, ओबीसी आणि दलितांबरोबर आदिवासी समाज देखील आमच्याबरोबर असेल. अल्पसंख्याकांनाही आमच्या बरोबर घेऊन आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत 170 ते 180 जागा निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.