राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारातील विद्यमान खासदार उदयनाराजे यांना आगामी लोकसभा (२०१९) निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळणार का? हा सध्या पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचा विषय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून खा. उदयनारांजेंच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी, केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र खा. उदयनराजेंना एक खास ऑफर दिली आहे. आठवलेंच्या या ऑफरची राजकीय वर्तुळात चर्चा तर रंगली आहे. पण, आठवलेंच्या ऑफरबाबत खा. उदयनराजे काय प्रतिसाद देणार याबाबतही उत्सुकता आहे.
खा. उदयनरांजेंच्या उमेदवारीबद्दल राष्ट्रवादीतूनच अंतर्गत विरोध असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून झळकले होते. त्यामुळे त्यांना पक्षातून तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याच चर्चेचा धागा पकडत मंत्री आठवले यांनी राजेंना ऑफर दिली आहे. आठवले म्हणाले, खा. उदयनराजेंना सातारा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी रिपाइंकडून लढावं. ते आमच्या तिकीटावर लढले तर, राजेंना आम्ही निवडूण आणू, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, राजेंनी रिपाइंकडून लढावं यासाठी आपण त्यांना फोन करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.
दरम्यान, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपसोबत आल्यास आपण आपल्या पक्षासाठी (रिपाइं) २ जागा मागू. जर, शिवसेना सोबत नाही आली तर, चार जागा मागू असेही आठवले या वेळी म्हणाले.