महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (12 जून) त्यांच्या वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांचा 14 जून दिवशी वाढदिवस असतो. दरवर्षी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठी गर्दी करतात मात्र यंदा राज्यातील कोरोना संकट पाहता त्यांनी सार्यांना जेथे आहात तेथेच रहा असं सांगत एक भावनिक पत्र शेअर केलं आहे.
राज ठाकरे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये ' मला वाढदिवसाच्या शुभेच्छा येऊ नका. जिथे आहात तिथे जनतेला मदत करा. दिलासा द्या.' याच माझ्यासाठी शुभेच्छा.' अशी सूचना वजा आदेश मनसे अध्यक्षांनी काढला आहे. कोरोनाच्या दहशतीमध्ये वाढदिवस साजरा करण्यासारखी परिस्थिती नाही. सारं सुरळीत झाल्यानंतर नक्की भेटायला येईन असा विश्वास देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
राज ठाकरे यांचे ट्वीट
#COVID19 #महाराष्ट्र #महाराष्ट्रसैनिक #gratitude #मनसे #MNS pic.twitter.com/sTl9vne2dN
— Raj Thackeray (@RajThackeray) June 12, 2020
देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यात 97 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तर दिवसेंदिवस नवे रूग्ण आढळ्याच्या संख्येमध्येही वाढ होत आहे त्यामुळे ही राज्यासाठी मोठी चिंताजनक बाब आहे. सध्या राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता राजकीय, सांस्कृतिक सोहळ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहे. 30 जून पर्यंत राज्यात लॉकडाऊन लागू आहे. मात्र आर्थिक व्यवस्थेला चालना मिळण्यासाठी आता काही ठिकाणी संचारबंदीला शिथीलता देण्यात आली आहे. तर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.