Mumbai Rains Update: मुंबईत आजही पावसाची संततधार सुरु, पुढील 3,4 दिवस मुंबईकरांना काळजी घेण्याचे हवामान विभागाकडून आवाहन
Photo Credit: File Image

Mumbai Rains Update: मुंबईत काल झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपले. पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले तर अनेक ठिकाणी वॉटर लॉगिंग सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये रस्ते वाहतूक पुर्णपणे कोलमडली होती तर रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली होती. आजही पावसाची संततधार सुरुच असून काही भागात मात्र पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. असे असले तरीही आज मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 3-4 मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपासून किंवा उद्या पहाटेपासून पाऊस पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Mumbai High Tide Update Today: मुंबईत आज 12 वाजून 17 मिनिटांनी भरती, 4.26 मीटर उंचीच्या लाटांची शक्यता; रेल्वे सह सार्‍या यंत्रणा अलर्टवर

मुंबईत मागील 24 तासांत 231.3 मिमी पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

काल पहिल्याच दिवशी पावसाने मुसळधार आगमन केल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीट तर उडालीच. परंतू, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कोलमडली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. प्रामुख्याने सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता आदी ठिकाणी मुंबई तुंबल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकल सेवा थांबली. स्त्यांवरही पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली. प्रामुख्याने सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती.