नागपूर: रेनकोट समजून रुग्णालयातील पीपीटी किट चोरी करणे तळीरामाला पडले महागात; वैद्यकिय तपासणीत आला कोरोना पॉझिटीव्ह
Coronavirus | (Photo Credits: PTI)

मद्यधुंद अवस्थेत जखमी झालेल्या एका तळीरामाला (Drunker) नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने केलेला अजब प्रकार डोळे चक्रावणारा होता. दारुच्या नशेत असलेल्या या व्यक्तीने रेनकोट (Raincoat) समजून रुग्णालयातील पीपीटी किट चोरली. त्यानंतर तो तेथून पळून गेला. मात्र त्याच्या जवळ राहणा-या एका सतर्क नागरिकांना याबाबत प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर त्या माणसाला पकडून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) असल्याचे समजताच त्या तळीरामाची मद्याची झिंग उतरली.

चोरी करणारा तळीराम मद्याच्या नशेत गटारात पडला. यात तो जखमी झाल्यामुळे त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून जात असताना त्याने रेनकोट समजून पीपीटी किट लंपास केली आणि तेथून पळ काढला. त्यानंतर घरी गेल्यावर तो आपल्या मित्राला हा रेनकोट असल्याचे सांगू लागला. त्यावेळी ही काहीतरी वेगळी भानगड असल्याचे एका नागरिकाच्या लक्षात आले. त्याने लगेच नगरपरिषदेला याबाबत माहिती दिली. Coronavirus In Mumbai Today Case: मुंबईत आज 1 हजार 100 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 53 जणांचा मृत्यू

त्यानंतर त्या तळीरामाला पुन्हा रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकिय तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. आरोग्य विभागातील कर्मचा-यांनी ती पीपीटी किट जाळून टाकली. त्यानंतर त्या मद्याच्या नशेत असलेल्या व्यक्तीची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून आतापर्यंत राज्यात 4 लाख 22 हजार 118 कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) रुग्ण आढळले आहेत. राज्यात काल (31 जुलै) दिवसभरात 10 हजार 320 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 265 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 14,994 वर पोहोचला आहे.