प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशभरातील रेल्वे गाड्यांमधील चोरीची (Train Theft)  माहिती समोर आली आहे. रेल्वे मधील चोऱ्यांच्या बाबतीत देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेश दुसर्‍या क्रमांकावर आहे. दिल्ली, गुजरात आणि तामिळनाडूची नावे टॉप -5 राज्यात आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरबीच्या अहवालात हे उघड झाले आहे. महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशविषयी माहिती अहवालात दिलेली नाही. असह्प्रकारे रेल्वे मध्ये होणाऱ्या चोऱ्यांमध्ये तब्बल 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालानुसार रेल्वेमध्ये चोरीच्या 74 हजाराहून अधिक घटना घडल्या आहेत.

एकूण घडलेल्या चोऱ्यांमध्ये सुमारे 157 कोटी रुपयांची संपत्ती चोरीला गेली आहे. अहवालानुसार दोन वर्षांत देशातील रेल्वेमधील गुन्ह्यांमध्ये सुमारे 45% वाढ झाली आहे. या अहवालात म्हटले आहे की 2017 साली ट्रेनमध्ये 11 लाखाहून अधिक गुन्हे घडले आहेत. त्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक चोरी आणि दरोडेखोरीची प्रकरणे आहेत. 2017 साली रेल्वेमध्ये चोरीच्या एकूण 74,317 घटना घडल्या. यापैकी 12 हजाराहून अधिक प्रकरणे मेट्रो रेलशी संबंधित आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या काळात चोरी झालेल्या वस्तूंची किंवा अन्य मालमत्तेची किंमत अंदाजे 157 कोटी इतकी आहे. 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये देशभरात रेल्वेगाड्यांमधील गुन्ह्य़ात 3.6 टक्के वाढ झाली आहे. (हेही वाचा: रेल्वेमध्ये नाश्ता पासून ते जेवणाच्या किंमती वाढणार असल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री)

इतर राज्यांच्या तुलनेत डोंगराळ राज्ये रेल्वे प्रवासाच्या बाबतीत सुरक्षित आहेत. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त आसाम, त्रिपुरा या पर्वतीय राज्यांमधील गाड्यांमध्ये चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. मात्र अशा राज्यांमध्ये फार कमी रेल्वे सेवा आहेत. दरम्यान, भारत सरकारने अशा कोट्यावधी रेल्वे प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. नवीन रेल्वे सुविधेच्या माध्यमातून आपण चालत्या गाडीत चोरी झाल्यास एफआयआर नोंदवू शकाल. 10 ऑक्टोबरपासून प्रवाशांना या सुविधेचा लाभ  उपलब्ध करून देण्यात आला आहे. जीआरपीने यासाठी एक खास अ‍ॅप तयार केले आहे. 'जीआरपी सहयात्री' असे हे अ‍ॅप असून त्याद्वारे तुम्ही तुमच्या चोरीची तक्रार ताबडतोब नोंदवू शकता.