पुण्यातील (Pune) वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या सिंहगड रस्ता, धनकवडी ते येवलेवाडी या दक्षिण पुण्याच्या भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी विस्कळित झाल्याने 17 ते 23 जुलै या आठवड्यातील सर्व 7 दिवस पाणी पुरवठा सुरू असेल. खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने मे महिन्यापासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा (Water Supply) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याचा सर्वाधिक फटका हा वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागाला बसला आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: पुढील चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्याता, विदर्भात यलो अलर्ट)
दोन ते तीन दिवस या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने वडगाव केंद्राच्या हद्दीतील पाणी पुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले. पाणी पुरवठा विभागाने वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या भागातील पाणी पुरवठा बंद ठेवला पण जलकेंद्रात बिघाड झाल्याने या भागात दोन दिवस पाणी नव्हते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे पुणे महापालिकेने या भागात पुढच्या आठवड्यातील पाणी बंद मागे घेतले आहे.
दर गुरुवारी होणाऱ्या पाणी कपातीमुळे जवळपास 20 टक्के भागात शुक्रवार आणि शनिवारी अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या समस्येबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी केल्या आहेत. यावर उपाय म्हणून जलवाहिनीतील हवेचा दाब कमी करण्यासाठी 150 हून अधिक एअर व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. या उपायामुळे अनेक भागात पाणीपुरवठा सुधारला आहे. मात्र काही भागात अजूनही पाण्याची समस्या कायम आहे.