Coronavirus Vaccine Update: चीन मधील वुहान (Wuhan) प्रांतातून जगभर दहशत पसरवणार्या कोरोना व्हायरसने 1800 हून अधिक बळी घेतले आहेत.दरम्यान या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लस विकसित करण्याच्या प्रयत्नाला यश आलं आहे. दरम्यान पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) लस विकसित केल्याचं वृत्त समोर आलं आहे. अमेरिकेच्या बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या (Codagenix) मदतीनं ही लस विकसित करण्यात आली आहे. सध्या ही लस प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सहा महिन्यांनंतर व्यक्तीवर या लसीची चाचणी होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला दिलं 'कोविड-19' हे अधिकृत नाव.
सध्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेली लस सुरक्षा कवच निर्माण करते, शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवते असा दावा करण्यात आला आहे. पुढील 6 महिन्यामध्ये ही लस मानवी चाचणीसाठी देखील तयार होणार आहे. दरम्यान SII चे सीईओ अदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतक्या वेगाने भारतात विकसित केलेली ही पहिलीच लस आहे. मानवी चाचणीनंतर लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर तिचा वापर करता येणार आहे. पुढे वर्षभर मानवी शरीरावर त्याची चाचणी केली जाणार आहे. यामुळे कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यास मदत होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
चीनमधील हुबेई प्रांतात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. हुबेई प्रांतातील वुहान शहरातून या व्हायरसची लागण सुरू झाली. कोरोनामुळे आतापर्यंत 1868 जणांचा बळी गेला असून 72 हजार 436 जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती जारी केली आहे. करोनाचे 1097 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, 11 हजार 741 रुग्णांची प्रकृती नाजूक आहे.