अरे वाह! वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांंना पुणे पोलीस देणार गिफ्ट कुपन; खरेदीवर आणि हॉटेलिंगवर मिळणार सूट
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

Pune: पुणेकरांसाठी त्यांचे शहर म्हणजे एक वेगळेच विश्व आहे. इथले नियमही पुणेकर स्वतः च बनवतात. म्हणूनच जेव्हा पुण्यात हेल्मेट सक्ती (Helmet compulsion) करण्यात आली तेव्हा पुणेकरांनी या गोष्टीला विरोध दर्शवला. त्यानंतर दंडाच्या भीतीने पगडी ऐवजी जरी हेल्मेट दिसू लागले असे तरी, पुण्यातील वाहन चालक अजूनही वाहतुकीचे नियम (Traffic Rules) पाळत नसल्याचे दिसत आहे. यावर उपाय म्हणून आता पोलीस चक्क सुजाण चालकांना जे रहदारी नियम पाळतील त्यांना गिफ्ट कुपन देणार आहेत. या कुपनमुळे तुम्हाला विविध खरेदीवर सूट मिळणार आहे. दिव्य मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या लोकांसाठी पुण्यात नवी ‘आभार योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जर का तुम्ही वाहतुकीचे सर्व नियम पाळले तर तुम्हाला गिफ्ट कुपन मिळणार आहे, त्याद्वारे तुम्हाला हॉटेलिंगवर आणि खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. जे लोक हेल्मेट घालतील, सिग्नल्स पाळतील, लायसन्स-कागदपत्रे बाळगतील अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गिफ्ट कुपन्स दिले जाणार आहेत. (हेही वाचा: पुणे: हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई; लाखोंचा दंड वसूल)

या कुपनमुळे शहरातील जवळजवळ 135 दुकाने, हॉटेल्सवर 10 टक्के सूट मिळणार आहे. पोलिसांकडून एसएमएसच्या माध्यमातून या गिफ्ट कुपनचा कोड पाठवला जाईल. या गिफ्ट कुपनची वैधता 1 महिना असणार आहे. दरम्यान, जवळजवळ 70 लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात, 27 लाखांवर दुचाकी तर साधारण 13 लाख  चारचाकी वाहने आहेत. वाहतुकीचे नियम मोडल्याने पुण्यात दररोज साधारण 1 हजार केसेस दाखल होतात.