Pune Fake Currency Racket: पुण्यात बनावट नोटा छापण्याच्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, चीनमधून मागवला होता कागद, सहा जणांना अटक (Video)
Currency Notes | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

ऑनलाइन ऑर्डर केलेल्या चायनीज कागदावर 500 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा (Fake Indian Currency) छापणाऱ्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुण्यात पर्दाफाश केला. अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, या प्रकरणी एका अभियंत्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अखत्यारीतील देहू रोड पोलीस ठाण्याने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 500 रुपयांच्या 440 बनावट नोटा, अर्धवट छापलेल्या 4,700 नोटा, 4,484 छापील व चिनी बनावटीच्या कागदाच्या 1000 शीट्स, एक छपाई मशीन, लॅपटॉप, पेपर कटिंग मशिन व इतर मुद्देमाल जप्त केला.

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ही कारवाई केली. अहवालानुसार, आयटी अभियंता ऋतिक खडसे (22) याने त्याच्या काही मित्रांसोबत प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी अप्पा बळवंत चौक परिसरातून जुने प्रिंटिंग मशीन खरेदी केले होते. दिघीमध्ये पत्रिका, हँडबिल आणि इतर प्रसिद्धी साहित्य प्रकाशित करण्यासाठी स्वतःचे प्रिंटिंग युनिट सुरू केले. मात्र पुरेशा ऑर्डर न मिळाल्याने त्यांचा व्यवसाय तोट्यात गेला. यानंतर, मुख्य आरोपींपैकी एक, 41 वर्षीय सूरज यादव (जो ड्रायव्हर आहे) याला सहज पैसे कमवण्यासाठी बनावट भारतीय चलनी नोटा छापण्याची कल्पना सुचली.

नोटा डिझाईन करण्याची कला आपल्याला अवगत असल्याचा दावा सूरज यादवने केला. त्यानंतर त्यांनी एका चिनी ई-कॉमर्स पोर्टलवरून पेपर मागवला. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर वॉटर मार्क, धागा आणि इतर सुरक्षा फीचर्ससह 500 रुपयांच्या 140 नोटा छापल्या. 1 लाख रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या 200 बनावट नोटा छापण्यासाठी त्याने 40,000 रुपयांची ऑर्डर मिळवली. मात्र यादव याने मुकाई चौकात काही ग्राहकांना बनावट नोटा देण्याचा प्रयत्न केला असता त्याला रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली तेव्हा त्याच्याकडे 500 रुपयांच्या 140 नोटा आढळल्या. (हेही वाचा: ऑनलाईन 49 रुपयांमध्ये 48 अंडी खरेदी करण्याची ऑफर; महिलेने गमावले 48 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर)

पुढील चौकशीमध्ये यादवने सर्व माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली. फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इतरांमध्ये प्रणव गव्हाणे (31), आकाश धंगेकर (22), तेजस बल्लाळ (19) आणि सूरज साळुंखे (32) यांचा समावेश आहे, सहाही आरोपींना आठवडाभर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, या रॅकेटचे जाळे किती पसरले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.