पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: आंबेगाव, इंदापूर, मावळ जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
पुणे जिल्हा मतदार संघ (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे पुणे (Pune). आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा (Congress-NCP) बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जायचा मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने (BJP) इथे खिंडार पाडले आहे. आता आपली सत्ता इथे टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात प्रचारसभा घेत आहेत. दुसरीकडे शरद पवारांच्या बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली आहे. पुण्यात तब्बल 21 मतदार संघ आहेत. मागच्या विधानसभेमध्ये भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या पराभवानंतर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा आपली पकड घट्ट करण्यासाठी कंबर कसली आहे. चला पाहूया पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आणि लढती

आंबेगाव (Ambegaon) – आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप वळसे पाटील हे सलग 29 वर्षे या मतदारसंघात आमदार राहिले आहे. आता 1990 पासून सुरु झालेली ही परंपरा 2019 सालीही पुढे चालते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्या या मतदारसंघातून राष्टवादी कॉंग्रेसकडून दिलीप वळसे पाटील, शिवसेनेकडून राजाभाऊ भिवसेन बाणखेले, मनसेकडून वैभव दत्तात्रय बाणखेले, जनता दल कडून (सेक्‍युलर) नाथू हरिभाऊ शेवाळे, बहुजन समाज पार्टीकडून रवींद्र बाबुराव चव्हाण, भारतीय नवजवान सेनेकडून संजय लक्ष्मण पडवळ, राईट टू रिकॉल पार्टीकडून विशाल पोपट ढोकले, अपक्ष म्हणून अशोक दत्तात्रय काळे पाटील, अनिता शांताराम गभाले असे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

इंदापूर (Indapur) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे या दोघांचेही वर्चस्व या मतदारसंघावर होते. आता हर्षवर्धन पाटील भाजपकडून तर दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी कडून एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. इंदापूर मतदार संघातून हर्षवर्धन पाटील सलग चार वेळा निवडून आले आहेत.

इंदापूर विधानसभा मतदार संघ 2014 निकाल -

दत्तात्रय भरणे, (राष्ट्र्रवादी) – 1,08,400 (विजयी)

हर्षवर्धन पाटील (काँग्रेस) – 94, 227

ज्ञानदेव चवरे (भाजप) – 4,260

विशाल बोन्द्रे (शिवसेना) – 2,184

मावळ (Maval) –  मावळ विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील मावळ लोकसभा मतदारसंघात येते.  येथून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत 2 लाख 15 हजार 913 मतांनी विजय मिळविला. भाजपाचे संजय भेगडे येथून विद्यमान आमदार आहेत. संजय भेगडे हे भाजप पक्षाचे आमदार असून 2014 साली ते 95, 319 मतांनी विजयी झाले होते. 2009 सालीही इथे भाजपचाच बोलबाला होता. भाजपकडून संजय उर्फ बाळा भेगडे सलग दोन वेळा आमदार झाले आहेत. यावेळीही भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे त्यामुळे चिडलेल्या सुनील शेळके यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

यावर्षीही भाजपने इथून संजय भेगडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने सुनील शेळके यांना उभे केले आहे.

दरम्यान, वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.