Khadakwasala Dam

राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती पहायला मिळत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही गेल्या 2 -3 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पुण्यातील  धरणातील पाणीसाठा वाढताना दिसतोय. राज्यात यंदा पावसाचे आगमन उशीरा झाल्याने शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये हवा तसा पाणीसाठा जमा झालेला नव्हता. यामुळे प्रशासन आणि नागरिक चिंतेत होते. पंरतू या मुसळधार पावसामुळे त्यांना काहीश्या प्रमाणात दिलासा हा मिळाला आहे.  (हेही वाचा - Mumbai Water Storage: मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ)

पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण 52 टक्के पाणीसाठा हा जमा झाला आहे. खडकवासला धरण 64 टक्के भरले असून मागील वर्षी आजच्या दिवशी 95 टक्के इतका पाणीसाठा होता. संततधार पावसामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ झाली असली तरी सुद्धा मोठ्या पावसाची अपेक्षा पुणेकर करत आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे येतात.

पुणे विभागातील प्रमुख धरणांमधील खडकवासला धरणात 64.10 टक्के, पानशेत धरणात 55.63 टक्के, वरसगाव धरणात 51.94 टक्के, टेमघर धरणात 35.31 टक्के पाणी साठा हा उपलब्ध आहे.  पुण्याच्या काही विभागात सध्या 10 टक्के पाणी कपात ही लागू करण्यात आली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पुरेशा पाण्याच्या पातळीत वाढ झाली झाल्यास ही पाणी कपात रद्द करण्यात येऊ शकते.