BMC Office | File Phot

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पी-उत्तर वॉर्डमध्ये मालाड, मढ आणि कुरार हे भाग समाविष्ट आहेत. आता या भागात बनावट नकाशे बनवून बांधलेल्या सुमारे 123 मालमत्ता आढळून आल्या आहेत. या महिन्यात वॉर्ड कार्यालयाने आतापर्यंत अशी 24 अनधिकृत बांधकामे पाडली आहेत आणि उर्वरित बांधकामांसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पी-उत्तर वॉर्डचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त कुंदन वळवी यांनी याबाबत माहिती दिली. वळवी म्हणाले की, मुंबईतील इतर नागरी वॉर्डांच्या तुलनेत या वॉर्डमध्ये मालमत्तांची संख्या जास्त आहे, विशेषतः बनावट नकाशे वापरून बांधल्या गेलेल्या बंगल्यांची.

अशी बहुतेक बांधकामे मढ, कुरार परिसरात आहेत आणि बीएमसी सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवते. इथले निसर्गरम्य सौंदर्य लक्षात घेता, मालक विस्तारित क्षेत्रांचा वापर करतात. इथले अनेक बंगले चित्रपट आणि मालिका चित्रीकरणासाठी वापरले जातात. या मालकांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. याआधी मालाडच्या मढ भागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना, बीएमसीने बॉलीवूड अभिनेता आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना एरंगले गावातील एका भूखंडावर बेकायदेशीर तळमजल्याची रचना बांधल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. (हेही वाचा: Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य)

नोटीसमध्ये त्यांना बदलांचे समर्थन करण्याचे निर्देश देण्यात आले, अन्यथा बांधकाम स्वतःच्या जोखमीवर पाडले जाईल, तसेच नागरी संस्थेने संभाव्य खटल्याचा इशारा देखील दिला. मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 475अ अंतर्गत, अशा उल्लंघनांसाठी दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे. बीएमसीने 13 मे रोजी माहिती दिली होती की, गेल्या एका वर्षात मढमध्ये बनावट नकाशे वापरून बांधलेल्या 101 इमारती आढळल्या आहेत. आतापर्यंत पी-नॉर्थ वॉर्डने अशा एकूण 24 मालमत्ता पाडल्या आहेत. पाडण्यात आलेल्या बंगल्यांपैकी एक बंगला 'तुझी माझी जमली जोडी' या प्रसिद्ध मराठी मालिकेच्या चित्रीकरणासाठी वापरला जात होता. गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ हे चित्रीकरण सुरू होते आणि नकाशानुसार बांधकाम न केल्याबद्दल बीएमसीने मालकाला शोकेस नोटीस बजावली आहे.