मुंबई: राजभवनातील भूमिगत बंकर यावर्षीपासून पर्यटकांसाठी खुले; आज राष्ट्रपतींच्या हस्ते झाले उद्घाटन
राजभवनातील भूमिगत बंकरचे उद्घाटन (संग्रहित-संपादित प्रतिमा)

मुंबईच्या राजभवन (Raj Bhavan) येथील भूमिगत भुयार (Underground Bunker Museum) आता पर्यटकांसाठी खुले होणार आहे. आज या बंकरचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वर्षअखेरपर्यंत हे भुयार नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती मिळत आहे. या भुयाराच्या 15 हजार स्क्वेअर फुटाच्या भागाचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे. हे भुयार ब्रिटीशकालीन असून त्याद्वारे त्याकाळातली माहिती पर्यटकांना मिळणार आहे. हे बंकर पाहण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे असणार आहे.

ऑगस्ट 2016 मध्ये या भूमिगत भुयाराचा शोध लागला होता. एकूण 13 कक्ष असलेल हे बंकर, दारुगोळा व तोफा ठेवण्यासाठी याचा कोठार म्हणून वापर केला गेला होता. सध्या या बंकरवर राज्यपालांचे घर व जलभूषण अशा दोन वस्तू उभ्या आहेत. या बंकरचा जेव्हा शोध लागला तेव्हा ते अतिशय वाईट स्थितीमध्ये होते. त्यानंतर त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट पार पडले व काही गोष्टींची डागडुजी करून त्याचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले. (हेही वाचा: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल सी विद्यासागर राव आणि विनोद तावडे यांनी घेतली लता मंगेशकर यांची भेट (Photos)

बंकरची डागडुजी केल्यानंतर तिथे आभासी वास्तवदर्शी संग्रहालय बनवण्यात आले. या भुयाराच्या सुरुवातीला 20 फूट उंच भव्य प्रवेशद्वार, ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा, असे अनेक कक्ष आहेत. या बंकरमध्ये खेळती हवा असून पुरेसा सूर्यप्रकाश येण्याची सोय यामध्ये करण्यात आली आहे. राजभवनाचा इतिहास, महाराष्ट्राचे वैभव तसेच ब्रिटीशकालीन अनेक गोष्टींची माहिती या संग्रहालयात मिळणार आहे.