Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन लहान मुलींचे अक्षय शिंदे याने लैंगिक शोषण केले होते. ही घटना समोर येताच बदलापूरसह संपू्र्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याने पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात अक्षय शिंदे ठार (Akshay Shinde Encounter) झाला. यावरुन विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. एन्काऊंटरच्या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच 'बदलापुरा' लिहिलेल आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांचं हातात रिव्हॉल्वर असलेलं पोस्टर मुंबईत झळकवण्यात आलं.
गृहखात्याच्या हलगर्जीपणामुळे अक्षय शिंदेला मारण्यात आलं, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मुंबईतल्या काही रसत्यांवर ‘बदलापुरा’ हे लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले आहे. त्यांचं हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. दरम्यान, अत्याचाराच्या या घटनेला सत्ताधाऱ्यांनी वेगळं वळण दिलं असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्टवर करतन्यायिक चौकशीची मागणी केली होती. अक्षय शिंदेवर गोळी झाडूने म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न नव्हता ना? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? असं म्हटलं होतं.
वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं की, आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. असे आरोप विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्टमध्ये केले होते.
अक्षय शिंदे याने दुसऱ्या पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला तळोजा कारागृहातून दुसरीकडे नेले जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.