
अमरावती येथील मंगरुळ चव्हाळा गावात शारदादेवी प्रतिष्ठापना उत्सव सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले. पोलिसांच्या भरधाव वेगाने आलेल्या गाडीने चिरडल्याने ४ चिमुकले जखमी झाले. रविवारी (१४ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, हे चिमुकले शारदादेवीची प्रतिष्ठपना करुन घराकडे निघाले होते. तर, त्याच वेळी ड्यूटी संपलेले पोलीसही व्हॅनने पोलीस स्टेशनकडे निघाले होते. दरम्यान, रस्ता ओलांडत असताना पोलीस व्हॅनने चिमुकल्यांना चिरडले. जखमी चिमूकल्यांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. नागरिकांचा संताप पाहून पोलिसांनी तेथून पोबारा केला. मात्र, गाडीच्या चालकास नागरिकांनी पकडले. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात हा प्रकार घडला. ही गाडी मंगरुळ चव्हाळा पोलीसांची असल्याची प्राथमिक माहिती आहे.