दोन बायकांचा खर्च भागवण्यासाठी नवऱ्याने छापल्या तब्बल पाच लाखांच्या बनावट नोटा; पोलिसांकडून अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबई: नोटबंदीनंतर अनेकांच्या काळ्या नोटा प्रकाशात आल्या. यामुळे झालेला फटका भरून काढण्यासाठी बहाद्दुरांनी अनेक नवीन शकला लढवायला सुरुवात केली, त्यातीलच एक म्हणजे खोट्या नोटा छापणे. मात्र मुंबईमधील एका महाभागाने चक्क दोन पत्नींचा खर्च भागवण्यासाठी खोट्या नोटा छापल्याचे समोर आले आहे. पटकथा लेखक असलेल्या या व्यक्तीने तब्बल पाच लाखाच्या खोट्या नोटा छापल्या होत्या. एका बॅगेत या सगळ्या नोटा भरुन आरोपी जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

देवकुमार पटेल असे या व्यक्तीचे नाव असून, तो नालासोपारा (मुंबई) येथे राहतो. ही व्यक्ती बनावट नोटांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार सापळा रचून पटेल याला अटक करण्यात आली. पोलिसांना बॅगेत 2000, 500, 200 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या असून, त्या नाशिक येथे तपासणीसाठी पाठवल्या आहेत. (हेही वाचा: नोटबंदीनंतर बनावट नोटांचा, भ्रष्टाचाराचा सुळसुळाट घाऊक पद्धतीने वाढला - शिवसेना)

देवकुमार याने दोन लग्ने केली आहेत. त्याची एक पत्नी मॉडेल आहे तर दुसरी गृहिणी आहे. मात्र दोन्ही बायकांचा खर्च भागवता भागवता देवकुमार मेटाकुटीस आला होता. यावर उपाय म्हणून त्याने ही शक्कल लढवली. यातील काही नोटा त्याने मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागात वापरल्या होत्या. तिथे या नोटा बनावट असल्याचा कोणालाही संशय आला नाही. मात्र पोलिसांनी आता कोणाकडूनही  नोटा घेताना अथवा एटीएममधून नोटा काढल्यावर त्या तपासून घेण्याचे आवाहन केले आहे.