PMC बँक घोटाळाप्रकरणी अजून एका खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
PMC Bank branch in Mumbai | (Photo Credits: PTI)

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी अजून एका खाते धारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बँक घोटाळ्यानंतर आतापर्यंत मृतांचा आकडा सहावर जाऊन पोहचला आहे. केशुमल हिंदुजा असे व्यक्तीचे नाव असून बँक घोटाळ्यानंतर तणावाखाली होते. तणावामुळेच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

केशुमल हिंदूजा यांचे पीएमसी बँकेत लाखो रुपये अडकले होते. तर बँक घोटाळ्यानंतर बँक खात्यातील रक्कम त्यांना काढता सुद्धा येत नव्हती. दरम्यान केशुमल हे आजारी असल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे ही नव्हते. सध्या पीएमसी बँक खातेधारकांना 50 हजार रुपयांची रक्कम काढता येणार असल्याचा निर्णय आरबीआयकडून जाहीर करण्यात आला आहे. बँक खाते धारक मर्यादित रक्कमेपेक्षा अधिक पैसे काढू शकत नाहीत.पीएमसी बँकेचे जवळजवळ 16 हजार खातेधारक आहेत. बँक घोटाळ्यामुळे आता हे सर्वजण अडचणीत आले असून त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर आता बँक ग्राहकांचा मृत्यू आणि पैशांबाबत मंजुरी यावर आरबीआयकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.(पीएमसी बँक खाते धारकांना मोठा दिलासा, आरबीआय संलग्न मालमत्ता लिलावासाठी काढणार)

यापूर्वी 21 ऑक्टोबरला सदरंगनी नावाच्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर फट्टोमल पंजाबी आणि संजय गुलाटी यांचा सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याचसोबत मुंबईती वर्सोवा मधील 29 वर्षीय एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मुरलीधर ढर्रा नावाच्या 83 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता.