पीएमसी बँकेच्या (PMC Bank) घोटाळा प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक नागरिकांचे लाखो रुपये यात अडकले आहे त्यानंतर आता पनवेल महापालिकेलाही (Panvel Municipal Corporation) याचा दणका बसला आहे. महापालिकेच्या मालकीचे सुमारे सात कोटी 67 लाख रुपये पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेत अडकल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने ही रक्कम ऑगस्ट 2018 मध्ये पीएमसी बँकेत ठेवली होती, मात्र आता आरबीआयच्या निर्देशानुसार ही रक्कम काढून घेण्यावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.
पीएमसी बँकेच्या विविध शाखांमध्ये अनेक सामान्य नागरिकांचे पैसे अडकले आहेत. मात्र आरबीआयने हे पैसे काढून घेण्यावर निर्बंध आणले आहेत. आता खातेदार 25 हजार बँकेतून काढून घेऊ शकतात. ही रककम वाढवावी यासाठी खातेदार निदर्शने करत आहेत. सामान्य नागरिकांसह अनेक संस्था, कंपन्या यांचीही खाती पीएमसी बँकेत आहेत. या घोटाळ्यामुळे त्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे. अशात पनवेल महानगरपालिकेनेही आपले सात कोटी 67 लाख या बँकेत ठवले असल्याची माहिती माहिती मिळत आहे.. (हेही वाचा: PMC Bank Crises: ईडीकडून HDILचे संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांच्या खाजगी वाहनांवर जप्ती)
महत्वाचे म्हणजे हे पैसे जवळजवळ 750 कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन आहे. सध्याची परिस्थिती पाहता या कर्मचाऱ्यांना हे वेतन कधी मिळणार हे सांगणे अवघड आहे. मात्र पनवेल महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी मनोजकुमार शेटे यांनी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. त्यानंतर होत असलेल्या चौकशीमधून, या बँकेमधील कर्जाची माहिती लपवण्यासाठी तब्बल 21 हजार खोटी खाती उघडण्यात आली असल्याचे माहिती समोर येत आहे.