चिक्की (File Image)

महाराष्ट्रातील आदिवासीबहुल पालघर (Palghar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील किमान दोन जिल्हा परिषद आणि राज्य सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहारात, बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याचा आरोप आहे. या घटनेची पुष्टी करताना पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सोमवारी पीटीआयला सांगितले की, या अन्नाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर अन्न पुरवठादारावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या समस्या प्रामुख्याने खानिवली येथील आनंद लक्ष्मण चंदावर विद्यालय आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 मध्ये नोंदवण्यात आल्या. या ठिकाणी चिक्की (गोड पोषणयुक्त नाश्ता) दूषित असल्याचे आढळले. पालकांनी दावा केला की चिक्कीमध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या होत्या. ते म्हणाले की, ‘यामुळे आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणावर विश्वास कसा ठेवायचा?’. (हेही वाचा: Kurla Tragedy: कुर्ल्यातील एसटी डेपोमध्ये बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू)

मुलांना दिले जाणारे अन्न हे शालेय शिक्षण विभागाच्या योजनेचा एक भाग आहे. याचा उद्देश वंचित विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार प्रदान करणे, त्यांच्या आहाराच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करणे आणि शाळेतील उपस्थितीला प्रोत्साहन देणे, हा आहे. आता अशा अन्नात बुरशी आणि अळ्या आढळून आल्यानंतर गदारोळ माजला आहे. बोडके म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नात बुरशी आणि अळ्या आढळून आल्याचे सत्य आहे. एका पालकाने दावा केला की, याबाबत त्यांनी वारंवार तक्रार केली आहे तरीही प्रशासन त्यांच्या मुलांकडे दुर्लक्ष करत आहे. बोडके यांनी नमूद केले की, जिल्हा-स्तरीय शिक्षण अधिकाऱ्यांनी नमुने गोळा केले आहेत आणि ते सविस्तर अहवालासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवले आहेत. प्रयोगशाळेने अहवाल सादर करेपर्यंत आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. अहवाल सादर केल्यानंतर कारवाई केली जाईल.